श्री कैलामाता मंदिर
श्री कैलामाता मंदिर
पाचोरा शहर व तालुक्याच्या धार्मिक इतिहासात आणि पवित्र्यात भर घालणारे पाचोरा येथील भडगाव रोडवरील कैलामाता मंदिर म्हणजे परिसरातील भाविकांचे शक्तीपीठ म्हणून नावारूपाला आले आहे. पाचोरा येथे नागपूर-मुंबई राज्य मार्गाला लागून भडगाव रोड कॉलेज चौफुली जवळ कैलामाता मंदिर उभारण्यात आले आहे.येथील दुग्ध व्यवसाईक जगदीश ( भाईसाहेब ) अग्रवाल व पुरुषोत्तम ( भाईसाहेब ) अग्रवाल यांनी स्व.बांगेलालजी अग्रवाल या आपल्या पिताश्रीच्या प्रेरणा,मार्गदर्शन व आशीर्वादाने आपले कुलदैवत असलेल्या कैलामातेच्या भव्य मंदिराची उभारणी केली. वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना ठरलेले कैलामाता मंदिर जळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे भव्य रमणीय व नेत्रदीपक मंदिर ठरले आहे.महाराष्ट्रीय कारागिरांनी मंदिराचा पाया भरणीचे काम,राजस्थानी कारागीरांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे काम,तर दक्षिण भारतातील कारागिरांनी कळसाचे व शिल्प कलेचे काम करून हे मंदिर साकारले आहे. वैशाक शुद्ध अष्टमीला कैलामातेचा वार्षिक स्थापना उत्सव साजरा होतो. त्या निमित्ताने होम,हवन जागरण,महाआरती,भंडारा असे विविध कार्यक्रम दोन दिवस चालतात त्या व्यतिरिक्त दररोज आरती,प्रसाद,धार्मिक मार्गदर्शन व वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम अग्रवाल कुटुंबीय पार पडतात. आपल्या कुलदेवतेच्या नावे अग्रवाल कुटुंबीयांनी माता श्री कैलादेवी शैक्षणिक विकास सेवा समितीची स्थापना करून विविध सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक उत्सव राबवून आपली धार्मिक व दानशूर वृत्ती सिद्ध केली आहे.
Back to Top
No comments:
Post a Comment